मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे.
सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा समाजाचे ओबीसीकरण करणं चालू असेल तर भटके विमुक्त, लहान लहान जाती यांच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा हा मोठा डाव होता आणि हा डाव सरकारने साधलेला आहे. यामुळे आता ही लढाई पुन्हा ओबीसी आणि मराठा, ओबीसी विरुद्ध सरकार अशी चालूच राहणार आहे. यातून फार मोठा अन्याय ओबीसी समाजावर झाला आहे.’, अशा शब्दांत ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.
यातून ओबीसीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे. मागच्या वेळी देखील या लोकांनी (राज्य सरकार) मनोज जरांगे यांना अशीच शेंडी लावली होती असं म्हटलं तरी चालेल. याही वेळेस तेच केलं आहे. एकतर असंच झालं असेल किंवा ओबीसींवर अन्याय तरी झाला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं म्हटल्यानंतर सरकारने ओबीसींना हा प्रचंड मोठा धक्का दिला आहे. यातून ओबीसींचे राजकीय नुकसान होणार आहे. तसेच लहान लहान जातींचं आरक्षण हडपण्याचं कारस्थान सरकारने केलं आहे असा गंभीर आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला.
