पुणे | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ६ कडून जोरदार कारवाई सुरू असून, दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला ‘बचक्या’ टोळीतील सराईत आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे क्रमांक ३५२/२०२५ व ३५०/२०२५ मधील पाहिजे आरोपी राजेश उर्फ ‘चौपाट्या राजा’ बबलू मंगल मंडळ (वय २९, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, मूळ रा. दरभंगा, बिहार) हा अंगूर वाईन परिसरात थांबल्याची माहिती मिळताच तात्काळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. सदर आरोपी हा दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मोबाईल चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या कुप्रसिद्ध ‘बचक्या’ टोळीशी संबंधित असून, तो सध्या मोक्का अंतर्गत गुन्ह्यात जामिनावर होता.
आरोपीवर यापूर्वी दाखल गंभीर गुन्हे राजेश उर्फ चौपाट्या राजा याच्यावर बंडगार्डन, लष्कर व विश्रामबाग पोलीस ठाण्यांत चोरी, दरोडा, मारहाण, धमकी, घरफोडी यांसारखे ८ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई ही उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक तसेच पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण (युनिट ६) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सपोनि मदन कांबळे यांच्यासह पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, कॉप्स-२४ मार्शल अंमलदार व युनिट ६ मधील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
👉 शहरातील गुन्हेगारीवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
