सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि मालट्रकची समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर नुकतेच लग्न झालेलं नवदम्पत्य गंभीर जखमी झाले आहे पांगरीजवळ जांभळबेट पुलावर कारचा चुराडा पांगरी गावाजवळील जांभळबेट पुलावर कारची मालट्रकशी जोरदार धडक झाली. धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून घटनास्थळीच गौतम कांबळे, जया कांबळे, संजय वाघमारे, सारिका वाघमारे यांच्यासह आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. लग्नाला अवघे चार दिवस – नवदम्पत्य गंभीर जखमी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत गौतम कांबळे आणि मेघना अनिकेत कांबळे यांचा 26 नोव्हेंबर रोजी विवाह झाला होता. देवदर्शनासाठी कुटुंबीय तुळजापूरकडे जात असताना हा अपघात झाला. धडकेत नवदम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने बार्शीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताचे कारण अस्पष्ट अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरात हळहळ – आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले नुकताच लग्नसोहळा आटोपून देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर दुर्दैव कोसळल्याने बार्शी तालुका आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
