पुणे | दि. १२ ऑक्टोबर २०२५ गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर यांनी पुन्हा एकदा आपल्या चोख तपास व तत्पर कारवाईद्वारे मोठा यश मिळवले आहे. घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस ताब्यात घेत पथकाने तब्बल ५ गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपीकडून तब्बल ₹२१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग दरम्यान चोखीढाणी, खराडी रोड, वाघोली परिसरात असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचून बिरजू राजपूतसिंग दुधानी (वय ४०, रा. रामटेकडी, वानवडी) यास नंबर प्लेट नसलेल्या स्विफ्ट डिझायर कारसह ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीकडे विविध घरफोडी प्रकरणांतील सोन्याचे दागिने आणि चोरीची गाडी आढळून आली. आरोपीकडून ₹२१,४०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी मोक्का गुन्ह्यातील आरोपी असून सध्या जामिनावर सुटलेला आहे. त्याच्यावर मुंढवा, येरवडा, चिखली, भोसरी एमआयडीसी आणि संत तुकारामनगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण (युनिट ६) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या यशस्वी ऑपरेशनमध्ये सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, तसेच पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी मोलाची भूमिका बजावली. गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की पुणे शहरातील घरफोडी करणाऱ्यांचे दिवस आता मोजकेच राहिले आहेत!
