कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव येथे गुरुवारी (दि. 9 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. काही हल्लेखोरांनी पहाटे चारच्या सुमारास एका घरात घुसून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पालकांनाही मारहाण करण्यात आली आहे.
हल्ल्याची थरारक कहाणी फिर्यादी प्रतीक ऊर्फ छोटू प्रफुल्ल शिंदे (वय 28) आणि त्याचा भाऊ सतीश शिंदे हे गुरुवारी पहाटे घरात झोपलेले असताना अचानक आरोपी किरण नितीन शिंदे, मंगेश बाळू जाधव (दोघे रा. धाकटे वेणगाव), जय सुनिल साबळे (रा. करंजाडे, पनवेल) आणि त्यांच्यासोबतचे दोन अनोळखी इसम काळ्या कारने घरासमोर आले.
दरवाजा तोडून घरात घुसलेल्या आरोपींनी चॉपर, कोयता व बंदुकीचा धाक दाखवून प्रतीक व सतीश यांच्यावर अंधाधुंद हल्ला केला. चॉपरने भोसकून व रिव्हॉल्वरच्या मुठीने मारहाण करण्यात आली. आरडाओरड होताच परिसरातील नागरिक धावून आले; पण हल्लेखोर काही क्षणांतच कार घेऊन पसार झाले.
पोलिसांची तात्काळ हालचाल घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक लटपटे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने तपास सुरू करून रक्ताचे नमुने, हत्यारे व पुरावे जप्त केले आहेत.
ग्रामस्थांचा संताप — कठोर कारवाईची मागणी दोन्ही जखमी भावांवर कल्याण आणि उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गावात तणाव आणि भीतीचे वातावरण असून, ग्रामस्थांनी हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चुलत भावांतील जुना वाद पृष्ठभूमीला प्राथमिक तपासानुसार हा हल्ला चुलत भावांतील वैमनस्यातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीही कर्जत परिसरात अशाच प्रकारचा गोळीबाराचा प्रकार घडला होता, त्यामुळे स्थानिकांमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तपास सुरू — आरोपींचा शोध तीव्र पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. “लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल,” असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
