पुणे | तब्बल 5 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या जबरी चोरीच्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नं. 96/2021, भा.दं.वि. कलम 392, 34 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी माणिक नागेश सगर उर्फ बबल्या (रा. शिवतेज नगर, हडपसर, पुणे) हा अनेक दिवसांपासून फरार होता.
दरम्यान, युनिट 6 चे पो.हवा. नितीन मुंढे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी काळेपडळ रेल्वे बोगद्याजवळ थांबलेला असल्याचे समजले. त्यानंतर पो.हवा. कानिफनाथ कारखेले, पो.हवा. बाळासाहेब सकटे व पो.अं. शेखर काटे यांनी तत्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ‘बबल्या’ असल्याचे कबूल केले.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहिद अ. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोठे यश मिळवले आहे.
