Bheed Crime News | 25 सप्टेंबर हत्याकांड
बीड – मित्राचा वाढदिवस साजरा करताना झालेल्या किरकोळ वादाने थरारक वळण घेतलं आणि त्यात 22 वर्षीय यश देवेंद्रसिंग ढाका (Yash Dhaka) याचा मृत्यू झाला. गुरुवारी (25 सप्टेंबर) रात्री माने कॉम्प्लेक्स परिसरात ही घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशला वडिलांनी कवेत घेतलं, ते क्षण पाहून उपस्थित सर्वच जण सुन्न झाले. यश हा बीडचे स्थानिक पत्रकार देवेंद्रसिंग सुरजसिंग ढाका यांचा मुलगा होता. पोलिसांनी आरोपी सूरज काटेला अटक केली असून इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात यश आणि सूरज यांच्यात वाद झाला होता. त्याच वैमनस्यातून गुरुवारी पुन्हा भांडण पेटले आणि सूरजने थेट यशच्या छातीत वार करत त्याचा खात्मा केला. शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात यशवर अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान, या हत्येनंतर सोशल मीडियावर यशचे काही जुने फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात तो सध्या कारागृहात असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसोबत दिसत आहे. या फोटोंवर गुन्हेगारी डायलॉग टाकून केलेल्या पोस्टमुळे चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात या घटनेमागे जुने वैमनस्य असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, व्हायरल पोस्टमुळे प्रकरणाला नवा रंग मिळाल्याने सर्व दुव्यांची छाननी सुरू आहे.
