पनवेल – पनवेल शहर हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना करंजाडे सेक्टर ७ मध्ये घडली आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाचीच दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) रात्री ८.३७ वाजता घडली. घटनेनंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. मृताचे नाव दत्तू असून आरोपी नागेश (२८) हा त्याचा सख्खा भाऊ आहे. प्राथमिक चौकशीत उघड झाले की, दत्तूचे आपल्या चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यावरून दत्तू आणि नागेश यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात नागेशने दगडाने दत्तूच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला.
या प्रकरणी दत्तूचा मुलगा दीपक याच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नागेश काळेला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
