हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व ३० हजार रुपये रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मंगेश तुकाराम मोहिते (वय २९, रा. प्रथमेश अपार्टमेंट, कदमवाकवस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. २०) कुटुंबासह वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या मोहिते कुटुंबीयांना सोमवारी सकाळी घरी परतल्यावर घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात पाहणी केली असता कपाट व लॉकर फोडून त्यातील सोन्याचे नेकलेस, कर्णफुले, तीन अंगठ्या, तीन नथ, छल्ला, पैंजण, चांदीची चैन, तीन चांदीच्या अंगठ्या तसेच ३० हजार रुपये रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरीस गेल्याचे समोर आले. लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
