१२ किलो गांजासह रिक्षा जप्त, ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे – उरुळी कांचनकडून निगडीकडे रिक्षातून गांजा वाहतूक करणाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा आणि रिक्षा असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लक्ष्मण राजू पवार (वय ३०, रा. यमुनानगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्कीम, निगडी) असे रिक्षाचालकाचे नाव असून, गांजा घेणारा मात्र पसार झाला आहे.
कारवाई कशी उलगडली? २१ सप्टेंबर रोजी पोलिस अंमलदार राहुल कर्डिले यांना गांजा वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने सापळा रचला. सकाळी सव्वा नऊ वाजता थेऊर रेल्वे पुलाजवळील सर्व्हिस रोडवर संशयास्पद रिक्षा दिसताच पोलिसांनी ती ताब्यात घेतली. तपासात २ लाख ४० हजार रुपयांचा गांजा आणि रिक्षा असा ५ लाखांचा माल मिळाला. कर्नाटकातून आणला होता गांजा पोलिस चौकशीत उघड झाले की, हा गांजा कर्नाटकातून आणण्यात आला होता. उरुळी कांचन येथे गांजा उतरवून निगडीतील व्यक्तीकडे पोहोचवण्यासाठी रिक्षातून वाहतूक सुरू होती. पोलिसांची पथक कारवाई ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर तसेच पोलीस अंमलदार माने, सातपुते, वणवे, देवीकर, राहुल कर्डिले, सोनवणे, दडस, कुंभार, पाटील, कुदळे, वीर, गाडे, शिरगीरे यांच्या पथकाने केली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
