मुंबई : मुंबई पोलिस दलातील हवालदार प्रवीण शालीग्राम सुर्यवंशी यांच्या मृत्यूमागील गूढ अखेर उलगडलं आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली असून, प्रवीण यांच्या हत्येमागे त्यांची पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांचा हात असल्याचं पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात प्रतिक्षानगर पोलिस अधिकारी वसाहत, सायन (पूर्व) येथे कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. वादाच्या भरात स्मिता आणि प्रतिक यांनी प्रवीण यांना खोलीतील खिडकीच्या काचेवर जोराने ढकलून दिले. या धक्क्यामुळे त्यांच्या हाताच्या नसा खोलवर कापल्या गेल्या तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. जखमी प्रवीण यांना तात्काळ रुग्णालयात न नेता, उपचार मिळवून न दिल्याने त्यांच्या शरीरातून अतिरक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला वडाळा टीटी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, सखोल चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतिक यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वडाळा टीटी पोलिस करत आहेत.
