पुणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येतून दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात पहिल्यांदाच डबल डेकर इलेक्ट्रिक एसी बस दाखल झाली असून लवकरच या बसेस पुण्याच्या रस्त्यांवर धावणार आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) च्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या या बसांची चाचणी प्रक्रिया सुरू आहे. स्विच मोबिलिटी कंपनीने तयार केलेल्या या बस आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून पूर्णपणे वातानुकूलित (एसी) आहेत.
वैशिष्ट्ये : बसची क्षमता : 60 प्रवाशांसाठी बसण्याची व 25 प्रवाशांसाठी उभे प्रवास करण्याची सुविधा.
आकारमान : लांबी 9.5 मीटर, रुंदी 2.6 मीटर आणि उंची 4.75 मीटर.
किंमत : प्रत्येकी बस जवळपास 2 कोटी रुपये.
सुविधा : आरामदायी आसनव्यवस्था, वेगवान व सुरक्षित प्रवासासाठी अत्याधुनिक डिझाईन.
कुठे धावणार? महापालिकेच्या योजनेनुसार या बसेसची पहिली फेरी हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा परिसरात सुरू करण्याची तयारी आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या व व्यावसायिक केंद्रे असल्याने प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 डबल डेकर बस सुरू होण्याची शक्यता असून, चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढील आठ–दहा दिवसांत त्या सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. पुणेकरांसाठी ही बस केवळ प्रवासाची नवी सोय नाही, तर शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत नवा टप्पा गाठणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
