‘एसटी’ आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक सोलापूर :
बंजारा समाजाला ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज सोलापुरात हजारो समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. नेहरूनगर येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. पारंपरिक बंजारा वेशभूषेत महिला, बैलगाड्या आणि युवकांच्या घोषणांनी संपूर्ण मार्ग दणाणून गेला होता.
“आरक्षण आमच्या हक्काचे… जय सेवालाल!” या घोषणांनी वातावरण ढवळून निघाले. बंजारा समाजाचा दावा आहे की ‘हैदराबाद गॅझेट’नुसार ते एसटी प्रवर्गात मोडतात; परंतु महाराष्ट्रात त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे राज्यभर आंदोलन पेटले असून, सोलापुरात या आंदोलनाने आज जोर धरला. मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. “सरकारने तातडीने आमची मागणी मान्य करावी; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा आयोजक सूरज चव्हाण यांनी दिला.
