कल्लाकुरिची (तमिळनाडू) :
अनैतिक संबंधांच्या घटनांमुळे पती-पत्नीतील वाद वाढताना दिसत आहेत. अशाच एका प्रकरणाने संपूर्ण तमिळनाडू हादरले आहे. पत्नीच्या परपुरुषाशी संबंधाचा संशय घेऊन संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचा छतावरच निर्घृण खून केला. धक्कादायक बाब म्हणजे दोघांची मुंडकी छाटून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर झाला. मृत महिला लक्ष्मी आणि तिचा प्रियकर थंगाराससु यांना आरोपी पती कोलांजीने धारदार शस्त्राने ठार केले. घटनेनंतर कोलांजीने दोघांची डोकी पिशवीत भरून दुचाकीला बांधली आणि थेट वल्लोर मध्यवर्ती कारागृहात जाऊन आत्मसमर्पण केले. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. लक्ष्मी आणि कोलांजीला तीन मुली असून, या घटनेनंतर त्या मुलींना नातेवाईकांकडे पाठवण्यात आले आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या घटनांतून स्पष्ट होतं की अनैतिक संबंधामुळे केवळ संसारच उद्ध्वस्त होत नाहीत तर गुन्हेगारीलाही खतपाणी मिळत आहे. विवाह संस्थेवरील विश्वास आणि जोडीदाराची किंमत कमी होत चालल्याने समाजात गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
