पुणे संपादक: बापु फुंदे
“दीड वर्षात तीनपट परतावा” देण्याचं गोड आश्वासन देत ब्लॅक औरा नावाच्या कंपनीने बारामतीत अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून गुंतवणूक करायला भाग पाडून नंतर वेबसाईट बंद करून गुंतवणूकदारांना अक्षरशः ससेहोलपट सोसावा लागला आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बारामतीतील नामांकित हॉटेलमध्ये खास सेमिनार घेण्यात आले. “लक्झरी आयुष्याचा पासपोर्ट” म्हणून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुंतवणुकीसाठी भाग पाडलं. स्थानिक प्रतिनिधींकडून भूपेंद्र मनी ट्रान्सफर नावाच्या खात्यावर लाखोंची रक्कम जमा करण्यास सांगण्यात आली. रक्कम जमा झाल्यानंतर कंपनीकडून वेबसाईटवर “वाढती गुंतवणूक” दाखवण्यात आली. काही काळानंतर अचानक ही वेबसाईट बंद पडली. प्रतिनिधींनी “दोन दिवसात सुरू होईल” अशी दिलासा देणारी उत्तरे दिली. मात्र काही दिवसांनी वेबसाईट कायमची गायब झाली. त्यानंतर गुंतवणूकदारांनी प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलणेही बंद केले. यात अनेक गुंतवणूकदारांचे लाखो रुपये अडकले असून, तक्रारी करूनही आजवर पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे फसवणूक करणारे प्रतिनिधी अजूनही बिनधास्तपणे वावरत असल्याचे चित्र आहे. गुंतवणूकदार मात्र आजही “आपली मेहनतीची रक्कम परत मिळणार का?” या प्रश्नाने हवालदिल झाले आहेत.
