लोणी काळभोर प्रतिनिधी :बापु फुंदे
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती आणि फुरसुंगी गावांमध्ये रविवारी रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला. ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, कदमवाकवस्तीतील घरांमध्ये पाणी शिरले. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने शेततळ्यांचे स्वरूप निर्माण झाले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राहत्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांनी रात्रभर डोळ्यांत तेल घालून जागरण केले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई व कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या तिन्ही गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झाले असून, खाजगी विकासकांनी ओढे बुजवणे किंवा त्यांची रुंदी कमी करणे यामुळे जलनिस्सारण व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.यापूर्वी महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते व पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम राबवली होती. त्याच धर्तीवर, नागरिकांकडून आता नकाशावरील ओढ्यांची मोजणी करून हद्दनिश्चिती करावी, अतिक्रमण हटवून ओढे खुले करावेत आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ओढ्यांवर अतिक्रमण सुरूच राहिल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
