मुंबई : राज्यातील शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवता येत नव्हते. परिणामी, शिक्षकांचे मोठे नुकसान होत होते.मात्र, अखेर एससीईआरटीने पुढील आठवड्यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे.🔹 राज्यातील सरकारी वेतनावर असलेल्या शिक्षकांच्या सेवेला १२ वर्षे पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवडश्रेणी लागू होते. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. या प्रशिक्षणादरम्यान आणि त्यानंतर चाचण्या होतात. चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतरच प्रमाणपत्र दिले जाते आणि त्यानंतरच वेतनश्रेणीत बदल होतो. यंदा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयांतील तब्बल ४० हजार ८१ शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३९ हजार ८४१ शिक्षक पात्र ठरले. यातून ३४ हजार ३१४ शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले, तर ३३ हजार ५७२ शिक्षक चाचण्या उत्तीर्ण झाले. अद्याप ५६३ शिक्षकांची प्रक्रिया अपूर्ण आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या हजारो शिक्षकांना प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शिक्षण विभागाने प्रशिक्षण जलदगतीने पूर्ण केले मात्र प्रमाणपत्रे देण्यात दिरंगाई केल्याने नाराजी पसरली होती. मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी हे प्रकरण एससीईआरटीच्या संचालकांकडे मांडले. त्यानंतर अखेर पुढील आठवड्यात सर्व पात्र शिक्षकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली आहे. यामुळे आता ३४ हजारांहून अधिक शिक्षकांचा मार्ग मोकळा होणार असून वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवता येणार आहेत.
