पुणे (भोसरी) : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गेलेल्या नांदेडमधील दोन महिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारास दहाच्या दरम्यान ही घटना घडली. अपघातात मामी प्रतिभा आंबटवार (वय ३२) व भाची कादंबरी गादेकर (वय १८, रा. बळीरामपूर, ता. नांदेड) यांचा मृत्यू झाला.
घटनेचा तपशील
भोसरी येथे राहणारे कृष्णा आंबटवार हे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. ते आपल्या पत्नी प्रतिभा आंबटवार व सात वर्षांच्या मुलीसोबत वास्तव्यास होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर रोजी प्रतिभा आंबटवार व त्यांची भाची कादंबरी गादेकर काही नातेवाईकांसोबत गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.
दरम्यान, विसर्जन मार्गावरील एका टी पॉईंटवर वळण घेताना एका ट्रकची समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. या धडकेच्या वेळी प्रतिभा आंबटवार व कादंबरी गादेकर मधोमध सापडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तातडीने दोघींनाही रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता बळीरामपूर येथील स्मशानभूमीत नातेवाईक, ग्रामस्थ व मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण वातावरण अत्यंत भावूक व शोकाकुल झाले होते.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मयत प्रतिभा आंबटवार यांच्या मागे सात वर्षांची कृषी ही लहान मुलगी आहे. एकाच वेळी दोन निष्पाप जीवांचे निधन, त्यातही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव व परिसरात शो
ककळा पसरली आहे.
