सोलापूर : सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या कलम 35(अ) आणि 56 अंतर्गत सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांनुसार बँक RBIच्या पूर्वपरवानगीशिवाय नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवी स्वीकारू शकणार नाही, तसेच कोणतीही मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण करू शकणार नाही.
बँकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर देखील मर्यादा आणण्यात आल्या आहेत. तथापि, ठेवीदारांना DICGC योजनेअंतर्गत प्रत्येकी ५ लाख रुपयांपर्यंत ठेव विमा संरक्षण मिळणार असल्याचे RBIने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, समर्थ सहकारी बँकेनेदेखील यासंदर्भात प्रतिक्रिया देत गेल्या तीन महिन्यांत बँकेने लक्षणीय प्रगती साधल्याचे सांगितले आहे. सभासदांचे भागभांडवल दुप्पट झाले असून संचालक मंडळ व अधिकारी सतत RBIच्या संपर्कात आहेत. “बँकेवरील ही बंधने लवकरच हटतील,” असा विश्वास समर्थ बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी व्यक्त केला आहे.
