सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने देशातील अनेक राज्यांत पुरस्थिती निर्माण केली होती. मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान खात्याने आणखी चिंताजनक अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा तब्बल ११५ टक्के अधिक पाऊस होऊ शकतो. एवढंच नाही तर हा पाऊस गेल्या ५० वर्षांतील विक्रमी पावसाचा रेकॉर्ड मोडू शकतो. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पाऊस फारसा होत नाही, मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. मान्सून सप्टेंबरमध्ये कमी होतो अशी नेहमीची पद्धत असताना, यावर्षी तो अधिक सक्रिय राहिला. अद्याप अनेक भागांमध्ये आर्द्रता असल्याने ऑक्टोबरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं आयएमडीने स्पष्ट केलं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबर हा कापणीचा हंगाम असल्याने भात, मका, सोयाबीन यांसारखी पिके मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त होऊ शकतात. शेतांमध्ये पाणी साचल्यास पिके कुजण्याचाही धोका आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसमोर मोठं संकट उभं राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
