कुंजीरवाडी (ता. हवेली) – धुमाळ मळा परिसरात महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई करत तब्बल २ लाख ३० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे काशिनाथ शंकर भोंडवे व शिवराम काशिनाथ भोंडवे (रा. गट नं. ३८९, धुमाळ मळा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी आहेत. महावितरणच्या मुळशी विभागातील उपकार्यकारी अभियंता दिप्ती पाटील यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथक तपासणीसाठी गेले असता, भोंडवे यांच्या घरातील मीटरचे सील तोडून छेडछाड केल्याचे आढळले. तपासात ग्राहकाने मीटरच्या सर्किटमध्ये रेझिस्टन्स बसवून तब्बल ८७ महिन्यांपासून १३,०२६ युनिटची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या चोरीमुळे महावितरणला २,२८,९२१ रुपयांचे नुकसान झाले असून, थकबाकी तडजोड देयकही भरलेले नाही. या प्रकरणी दिप्ती पाटील यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
