नाशिकमध्ये पूर्वनियोजित कट रचून एका तरुणाची कोयता आणि चॉपरने वार करून हत्या करण्यात आली. गुरुवारी (२५ सप्टेंबर) दुपारी पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कॅफेमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृतदेहावरून नातेवाइकांनी संताप व्यक्त करत आक्रोश केला. मृत तरुणाची ओळख
हत्या झालेल्या तरुणाचे नाव राशिद हारुन खान (२२, रा. अंबड लिंक रोड, खाडी) असे असून त्याची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मैत्रिणीच्या हाती ‘टीप’ पोचली
पोलिसांच्या माहितीनुसार, राशिदला त्याच्या मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावले होते. त्यानंतर त्या युवतीनेच हल्लेखोरांना त्याच्या उपस्थितीची माहिती दिली. आरोपींनी अचानक धाव घेऊन कोयता व चॉपरने वार करत राशिदचा खून केला.परिसरात तणाव, दंगल पथक पाचारण
घटनेची माहिती मिळताच मृताचे नातेवाइक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. आक्रोश आणि संताप व्यक्त केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. त्यामुळे दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत बंदोबस्त वाढविला. सहा आरोपी ताब्यात, युवतीही अटकेत
या खुनानंतर अवघ्या काही तासांत इंदिरानगर पोलिसांनी गॅस गँगशी संबंधित सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये त्या युवतीचाही समावेश आहे. उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.पोलीस उपायुक्तांचा इशारा
“गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. आणखी काही आरोपी या प्रकरणात सामील असण्याची शक्यता असून त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये,” असे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी स्पष्ट केले.
