तुळजापूर │ महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीच्या प्रभावी नियंत्रणासाठी मंदिर परिसरात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या साहाय्याने गुन्हेगारांची ओळख पटवणे चोरी, खिसेकापू रोखणे कायदा व सुव्यवस्था राखणे गर्दीचे अचूक नियोजन करणेअधिक सोपे होणार आहे.
मंदिर संस्थानने या एआय कॅमेऱ्यांमध्ये परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती अपलोड केली आहे. त्यामुळे गर्दीत असा कोणी आढळल्यास कॅमेरा लगेच अलर्ट देणार असून पोलिसांना त्वरित माहिती मिळणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसर, दर्शन मंडप आणि शहरातील प्रमुख ठिकाणी एकूण १०२ कॅमेरे बसवले गेले आहेत. हे कॅमेरे एकाच वेळी भाविकांची संख्या मोजू शकतात आणि ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे, त्याबाबत सतर्क करतात. धार्मिक स्थळांवर तंत्रज्ञानाचा हा नवा वापर सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक रूप देणारा ठरणार आहे. भाविकांना अधिक सुरक्षित आणि सुखद दर्शनाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भविष्यात इतर मोठ्या मंदिरांमध्येही अशाच प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाण्याची शक्यता आहे.
