पुणे संपादक : बापु फुंदे
फुरसुंगी, मुंढवा, कोंढवा आणि लोणी काळभोर परिसरात हातभट्टीची दारु विक्री करणे, दहशत माजविणे तसेच गंभीर गुन्ह्यात सामील असलेल्या ९ सराईत गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे यांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे. फुरसुंगी येथील प्रेमलता मुकेश करमावत हिच्यावर ६, तर पंकज मुकेश करमावत याच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यातील शेख अहमद उर्फ बबलु सय्यद याच्यावर खुनाचा प्रयत्न व बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे गुन्हे नोंदवले आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सागर संदिप गुडेकर याच्यावर जबरी चोरी, जीवे मारण्याची धमकी, हत्यार बाळगणे असे ४ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय लोणी काळभोर परिसरातील कुख्यात जाफर शाजमान इराणी टोळीतील मजलुम हाजी सय्यद, शब्बीर जावेद जाफरी आणि शाजमान हाजी इराणी यांच्यावर तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल असून या टोळीला देखील तडीपार करण्यात आले आहे.
जानेवारी २०२५ पासून परिमंडळ ५ कार्यालयाकडून २० सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएप्रमाणे कारवाई, ११ मोका कारवायांतून ७६ गुन्हेगारांना अटक आणि आतापर्यंत ४१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली
