निलंगा (ता. 20) : निलंगा-औसा रोडवरील निंबाळकर पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (ता. 18) सकाळी 11.55 वाजता झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हबीब हसन शेख (वय 32, रा. शेडोळ, ता. निलंगा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हबीब शेख हे मिस्त्रीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने निलंगा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच हबीब शेख हे आपल्या दुचाकीवरून (एमएच 24 एव्ही 0309) निलंग्याकडे निघाले. निंबाळकर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते बाहेर पडत असतानाच औसा मार्गावरून निलंग्याच्या दिशेने वेगात येणाऱ्या निलंगा-लातूर एसटी बसने (एमएच 13 सीयू 8653) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की हबीब शेख यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हबीब शेख यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक बहीण व तीन लहान मुली असा मोठा परिवार आहे. या अचानक झालेल्या मृत्यूमुळे शेडोळ गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
