लातूर :
कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे भीषण रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आली. लातूर शहरातील वस्ताद लहुजी साळवे चौकाजवळ बुधवारी (दि. 17 सप्टेंबर) मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. बार्शी रोडवरून औसा रोडमार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या इर्टिगा कार चालकाने क्रूझर जीपला कट मारला. याचा राग अनावर झाल्याने क्रूझर चालकाने जीप कारसमोर आडवी लावली. यावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली. वाद चिघळला आणि लाथा-बुक्क्यांनी हाणामारी सुरू झाली. दरम्यान, क्रूझरमधील एका आरोपीने जवळचा चाकू काढून इर्टिगा कारमधील तरुणावर सपासप वार केले.
तरुण ठार, महिला गंभीर जखमी या हल्ल्यात अनमोल अनिल केवटे (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. अनमोल हे माहिती अधिकार कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याच सोनाली भोसले (वय 40, रा. अंत्रोली, ता. सोलापूर) यांच्यावरही आरोपींनी चाकूचे वार केले. छाती व पाठीवर गंभीर जखम झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांची धडक कारवाई घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पाठलाग करून अहमदपूर येथून 24 वर्षीय एका आरोपीला अटक केली. या गुन्ह्यातील क्रूझर गाडी जप्त करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप सागर, जमादार राहुल सोनकांबळे, जमादार बालाजी कुटवाड आदी करत आहेत. या घटनेमुळे लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
