पुणे संपादक: बापु फुंदे
पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी (ता. हवेली) परिसरात भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. नारायण शाहूराज सूर्यवंशी (वय 36) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या सूर्यवंशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा नातेवाईक किरण रमेश कात्रे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, रिक्षाचालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळी न थांबता पसार झाला. हडपसर पोलिसांनी 796/2025 भा.न्या.सं.क. 106 (1), 125 (ब), 281, मो.वा.का.क. 184, 119/177 नुसार रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
