पुणे संपादक बापु फुंदे लोणी काळभोर, थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळे वस्ती परिसरात शनिवारी (ता.13) दुपारी प्लॉटिंगमध्ये मजुरी करणाऱ्या कामगाराला बांबूने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत मजूर गंभीर जखमी झाला असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी मजुराचे नाव सागर शंकर इंगळे (वय 40, रा. काळे वस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. तर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे समीर पाचोरकर व मनिषा पाचोरकर (रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) अशी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंगळे हे प्लॉटिंगमध्ये मजुरी करत असताना समीर व मनिषा पाचोरकर यांनी घटनास्थळी येऊन त्यांना शिवीगाळ केली. “येथे काम करू नकोस” असे सांगत हाताने मारहाण केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी इंगळे पळू लागले असता, मनिषा पाचोरकर यांनी त्यांना मागून पकडले. त्यानंतर समीर पाचोरकर यांनी बांबूने त्यांच्या डाव्या हातावर व पायावर वार केले. यात इंगळे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी इंगळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून समीर व मनिषा पाचोरकर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 118(2), 352 व महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करीत आहेत.
