पुणे संपादक: बापु फुंदे करंजेपूल बसस्टॉप परिसरात वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई – दोन महिलांची सुटका
बारामती तालुक्यातील करंजेपुल परिसरात वडगाव निंबाळकर पोलिसांनी मोठी कारवाई करत पैशाचे आमिष दाखवून दोन महिलांना जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून आरोपींकडील स्विफ्ट कारसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.अटक झालेल्या आरोपींची नावे सुयोग हिंदुराव खताळ व प्रीतम आप्पासाहेब घुले (दोघे रा. कापडगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी आहेत. त्यांच्याकडील स्विफ्ट कार (क्र. एमएच 11 एमडी 8055) देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांना कसा लागला सुगावा? पेट्रोलिंग दरम्यान करंजेपुल बसस्टॉप परिसरात लाल रंगाची काळ्या काचा असलेली कार संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ नाकाबंदी करून कार थांबवली असता आत दोन पुरुषांसोबत दोन महिला आढळल्या. महिला पोलिसांकडून चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. महिलांना पुण्यातील हडपसर येथून लोणंद येथे पैशाचं आमिष दाखवून आणलं होतं आणि जबरदस्तीने त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १४०(३), १४३(३), १४४(२), ३(५) तसेच महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत या प्रकरणामागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांची धडक कारवाई। ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, डी. एस. वारुळे, तसेच पोलीस हवालदार अमोल भोसले, एस. पी. देशमाने, रमेश नागटिळक, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे, निलेश जाधव व नागनाथ परगे यांच्या पथकाने केली.
