भंडारा : जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने प्रेमसंबंधात अडकविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलगे आणि एका अल्पवयीन मुलीवर पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर चौघेही एकाच शाळेत शिकलेले असून, दहावीपर्यंत ते वर्गमित्र होते. शाळा बदलूनही बारावीच्या ट्यूशनमुळे त्यांचा संपर्क कायम राहिला. या काळात एका मुलाचा त्याच्याच वर्गमैत्रिणीकडे कल वाढला. त्याने मुलीचा पिच्छा पुरवणे, पाठलाग करणे आणि प्रेमसंबंधांसाठी दबाव आणणे सुरू केले. त्याला इतर तिघांनीही मदत केली, असा आरोप आहे. सततच्या त्रासामुळे पीडित मुलगी मानसिक तणावाखाली गेली. इतकेच नव्हे तर तिने आत्महत्येचा विचारही केला. मात्र तिने योग्य वेळी आपल्या आई-वडिलांशी हकीकत सांगितली. पालकांनी धीर देत पवनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलीसांनी चौघांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे.
