राजस्थानमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. झुंझुनू जिल्ह्यातील 37 वर्षीय अंगणवाडी पर्यवेक्षक मुकेश कुमारी हिने तिच्या प्रियकराशी लग्नाचा आग्रह धरला, पण दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह तिच्याच कारमध्ये सापडला. या प्रकरणी प्रियकर मनाराम (शाळेतील शिक्षक) याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश कुमारी आणि मनारामची ओळख गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फेसबुकवर झाली होती. नंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मुकेश आपल्या पतीपासून विभक्त होती, तर मनारामचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित होता. 10 सप्टेंबर रोजी मुकेश झुंझुनूहून बाडमेरला कारने 600 किमी प्रवास करत मनारामला भेटायला पोहोचली. तिने त्याच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याबद्दल सांगितल्याने मनाराम संतापला. पोलिसांनी समुपदेशन करून त्यांना चर्चा करण्यास सांगितले होते.संध्याकाळी दोघे एकत्र असताना मनारामने लोखंडी रॉडने मुकेशच्या डोक्यावर वार केला. तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह तिच्या गाडीत ठेवून अपघातासारखा बनावट प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या सकाळी वकिलामार्फत पोलिसांना माहिती दिली. तपासात पोलिसांना संशय आला आणि चौकशीत मनारामने गुन्ह्याची कबुली दिली. मुकेशचा मृतदेह सध्या जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, “मनारामने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू आहे. प्रकरण सर्व बाजूंनी तपासले जात आहे.”
