नाशिक : ‘हैद्राबाद गॅझेट’च्या अंमलबजावणीवरून राज्यात निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर थेट टीका केली. नाशिकमधील कार्यकर्ता शिबिरात बोलताना त्यांनी आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारची भूमिका अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.🔹 आरक्षणाबाबत सरकारचा दृष्टिकोन अस्पष्ट
पवार म्हणाले, “हैद्राबाद गॅझेट मी शब्दशः दोनदा वाचले आहे. त्यात फक्त शेतकऱ्यांना सवलत नाही, तर व्हीजेएनटी आणि बंजारा समाजाला आदिवासी दर्जा देण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या समाजांतून नवी मागणी पुढे आली आहे. त्याचवेळी आदिवासी समाजाने मात्र आमच्या कोट्यात हात घालू नका, असा इशारा दिला आहे.”🔹 दोन समित्यांवर प्रश्नचिन्ह
राज्य सरकारने बावनकुळे समिती (ओबीसींसाठी) आणि विखे समिती (मराठ्यांसाठी) स्थापन केली आहे. यावर टीका करताना पवार म्हणाले, “एका जातीपुरतीच समिती करण्याची परंपरा नाही. संवाद साधताना सर्व घटकांना सामावून घेणे आवश्यक असते. सरकार खरंच प्रश्न सोडवू इच्छिते की फूट पाडू पाहते, हा प्रश्न आहे.” सामाजिक वीण धोक्यात
“या प्रश्नाचा योग्य रीतीने विचार केला नाही तर महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवेल आणि ही अतिशय धोकादायक स्थिती ठरेल,” असा इशारा पवारांनी दिला.🔹 शेतकरी प्रश्नांवरही सरकारवर टीका
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष वेधताना पवार म्हणाले, “गेल्या आठ महिन्यांत ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केंद्र सरकार शेतमालाला भाव देण्यात अपयशी ठरले आहे. कांदा निर्यात धोरणाचा अभाव, द्राक्ष-डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, जिल्हा बँकेची डबघाई – हे सगळे अपयश मोदी सरकारचे आहे.”
🔹 ‘मोदींची कार्यपद्धती चुकीची’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती चुकीची असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक फटक्यात सापडले आहेत,” अशी टीका पवारांनी केली.
राज्यातील आरक्षण प्रश्न आणि शेतकरी समस्यांवरून पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
