मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य ठरवली आहे. त्यामुळे राज्यातील ५२ वर्षांखालील सर्व शिक्षकांना आता टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. या निकालावर महाराष्ट्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी, राज्यातील हजारो शिक्षकांनी २३ नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे. फेब्रुवारी २०१३ पासून नव्या शिक्षक भरतीसाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, त्याआधी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ही अट नव्हती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच शिक्षकांना परीक्षा देणे बंधनकारक आहे. न्यायालयाने दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली असून, अपयशी ठरल्यास सक्तीची सेवानिवृत्ती करण्याचाही इशारा दिला आहे. यामुळे राज्यातील ९५ हजार शाळांमधील दीड ते पावणेदोन लाख शिक्षकांवर या निकालाचा थेट परिणाम होणार आहे.
अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून टीईटीसाठी अर्ज आणि प्रवेश शुल्क भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ ऑक्टोबर आहे. प्रवेशपत्र १० ते २३ नोव्हेंबरदरम्यान डाउनलोड करता येणार आहे. पेपर-१ सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर पेपर-२ दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
अधिक माहितीसाठी mahatet.in या संकेतस्थळावर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.
