राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला. मात्र, या जीआरला ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होत असून, “मराठा समाजाला ओबीसीमधून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्या” अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात शिंगारवाडी फाटा येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजातील मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद पेटला आहे. या वक्तव्यावर मराठा समाज आक्रमक झाला असून, हाके यांना इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हाके यांच्या विरोधात गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 🔹 जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हाके यांच्या वक्तव्याचा तीव्र समाचार घेतला. त्यांनी थेट मंत्री छगन भुजबळ आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत हाके हे त्यांचीच भाषा बोलत असल्याचा आरोप केला.
“तुमच्या लेकीबाळींना मी माझ्या लेकीबाळी समजतो. आतापर्यंत शांत राहिलो, पण आता बोलायला भाग पाडलं जातंय. भुजबळ आणि मुंडे यांना बोलता येत नाही, म्हणून त्यांनी हाकेला पुढे केलं आहे,” अशी जोरदार टीका जरांगे पाटील यांनी केली.। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आल्याने राज्यातील वातावरण अधिकच पेटण्याची शक्यता आहे.
