पुणे | प्रतिनिधी
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. नुकताच हा दिवस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षकांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.
पूर्वी शिक्षणाची पद्धत वेगळी होती. शिक्षक बडवून विद्यार्थ्यांना शिस्त लावत, पाढे पाठ करून घेत असत. पण आजच्या काळात कॅल्क्युलेटर, इंटरनेट, यूट्यूब, गुगल आणि चॅट जीपीटी यांसारख्या साधनांमुळे विद्यार्थी त्वरित उत्तरे मिळवू लागले आहेत. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संबंधांची व्याख्याच बदलली आहे.
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार झाला आणि पारंपरिक शिक्षणपद्धतीवर त्याचा मोठा परिणाम दिसून आला. आता कुठलीही शंका असो किंवा गृहपाठ असो, गुगल आणि विविध डिजिटल साधनांमुळे ती सहज सोडवली जाते. त्यामुळे “शिक्षकाची गरज काय?” हा प्रश्न नवीन पिढीच्या मनात निर्माण झाला आहे.
तथापि, विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अद्याप तितकेच आहे. कारण, शिक्षकाकडून मिळणारे ममत्व, जबाबदारीची जाणीव आणि घडवण्याची तळमळ कोणत्याही यंत्रामध्ये येऊ शकत नाही. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा खरा दीपस्तंभ शिक्षकच राहणार, हेच शिक्षक दिनाचे खरे महत्त्व आहे.
